मविआचा मुख्यमंत्रिपदाबाबत काय निर्णय झालाय?
शरद पवार सस्पेन्स मिटवत म्हणाले..!
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येऊन आमच्या तीन पक्षांमधील एक नेता मुख्यमंत्री होईल”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. ते म्हणाले, “आम्हाला राज्यात स्पष्ट चित्र दिसतंय की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल. सध्या राज्यात मविआला अनुकूल वातावरण आहे. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. त्यावेळी जनतेने त्यांच्या मनात काय आहे ते स्पष्ट सांगितलं आहे. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली होती, तेव्हा काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती, तर आम्ही चार जागा जिंकल्या होत्या.
आता झालेल्या (२०२४) लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने तब्बल ३१ जागा जिंकल्या. यावरून लोकांचा कल काय आहे ते स्पष्ट झालं आहे”.शरद पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील भाजपा व महायुतीवाले सांगत होते की डबल इंजिन सरकार येणार. देशभर नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रचार करत होते. तरीदेखील लोकांनी आम्हाला प्रचंड पाठिंबा दर्शवला. आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तसेच इतर काही योजनांच्या माध्यमातून पैसे ओतायचं काम चालू आहे. परंतु, लोकांमध्ये इतरही काही चर्चा आहेत. मी अनेक महिलांशी बोललो आहे. त्यांनी मला सांगितलं की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात पैसे आले तरी देखील त्या खुश नव्हत्या. त्या मला म्हणाल्या, तेलाचे भाव तुम्हाला माहिती आहेत का? महागाई किती वाढली आहे? याची तुम्हाला कल्पना आहे का? आम्ही मोठ्या कष्टाने मुलांना वाढवलं, मुलं पदवी घेऊन कॉलेजातून बाहेर पडली, मात्र त्यांना नोकरी नाही, हाताला काम नाही. अनेक मुलं बेकार हिंडतायत. म्हणजे एका हाताने सरकार देतंय आणि दुसऱ्या हाताने काढून घेतंय. त्या महिला सरकारविरोधात संतप्त होत्या”.
ते शरद पवार हे ‘मुंबई तक’शी बातचीत करत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, नाना पटोले, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कुठल्या नेत्यावर विश्वास दाखवला जाईल? त्यावर शरद पवार म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीतील नेतेमंडळी बसून यावर चर्चा करू. जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्यांचा नेता मुख्यमंत्री होईल. ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील आम्ही त्यांना विनंती करू की तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडा, आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा असेल. याचाच अर्थ ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल. माझ्या पक्षाचं हेच धोरण आहे”.