दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप निवडणूक समन्वयकपदी ॲड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीचा धूमधडाका सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात महायुती म्हणून शिंदे शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी विजय मिळवण्यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप निवडणूक समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची नियुक्ती केली आहे.ॲड. पटवर्धन यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा, चिपळूण विधानसभा आणि लांजा-राजापूर विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. महायुतीतर्फे रत्नागिरीमध्ये उदय सामंत, राजापूरमध्ये किरण तथा भैय्या सामंत आणि चिपळूणमध्ये शेखर निकम हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भाजपाचे कार्यकर्तेही सहभागी होत आहेत. प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांचे मते जाणून घेणे तसेच विकासकामे करण्याबाबतचे नियोजन करण्याची जबाबदारी ॲड. पटवर्धन यांच्यावर देण्यात आली आहे.ॲड. पटवर्धन यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून कोरोना कालावधीमध्ये चांगले कामगिरी बजावली होती.
भाजपा वाढीसाठी त्यांनी जे काम केले होते यामुळे आता दक्षिण रत्नागिरी जिल्हा निवडणूक समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५५ समन्वयकांची नेमणूक केली. यामध्ये ॲड. पटवर्धन यांची नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या निवडीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून पुढील आठ दिवसांत निवडणुकीसाठी जास्तीत जास्त प्रचार यंत्रणा राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सर्व उमेदवार विजयी व्हावेत म्हणून समन्वयातून अधिक जोमाने यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करून विश्वास सार्थ ठरवेन, असा मानस त्यांनी व्यक्त केला.