
नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक लादणाऱ्या शिवसेनेकडून पैसे वसूल करा स्वाभिमान पक्षांची मागणी
रत्नागिरी ः शहरवासियांनी पाच वर्षासाठी नगराध्यक्ष निवडून दिला होता. अंतर्गत राजकारणासाठी शिवसेनेने नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक शहरवासियांवर लादली आहे. या निवडणुकीचा खर्च शिवसेनेकडून वसूल करावा, अशी मागणी स्वाभिमान पक्षाचे जिल्हा प्रवक्ते नित्यानंद दळवी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाला झालेल्या मतदानापैकी ३० टक्के मतदान रत्नागिरी शहरात झाले. येथे स्वाभिमान हा दुसर्या क्रमांकाचा पक्ष आहे. शिवसेनेने लादलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वाभिमान रिंगणात असेल. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे, सरचिटणीस निलेश राणे यांच्याशी चर्चा करून उमेदवार निश्चित केला जाईल. सध्या स्वाभिमानमार्फत दोन उमेदवार स्पर्धेत आहेत. त्यापैकी एकाला पक्षाकडून तिकिट दिले जाईल. परंतु पोटनिवडणुक लढविण्याबाबतचा अंतिम निर्णय खा. राणे घेणार असल्याचे श्री. दळवी यांनी सांगितले.