महायुतीसाठी पैशांचे वाटप पोलिस व्हॅनमधून केले जातेय अनिल परबांचा खळबळजनक आरोप.

मुंबई : कायदा आणि पैशांचा दुरुपयोग करून सरकार कोसळवली जात आहेत. पैशांचा जोर असाच राहिला तर येणार्‍या काळात उद्योगपती अदाणीही पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटायला नको. यंदा तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमदेवारांना पोलिसांच्या व्हॅनमधून पैशांचे वाटप केले जातेय असा खळबळजनक आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते अनिल परब यांनी केला आहे.मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित ‘विधानसभा निवडणूक विशेष वार्तालाप मालिका’ उत्सव लोकशाहीचा २०२४ या मालिकेच्या पहिल्या भागात अनिल परब बोलत होते.

यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, कार्यकारिणी सदस्य विनोद साळवी, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर आदी मान्यवर उपस्थित होते.पोलिसांच्या वाहनातून पैसे चेक नाक्यावरून पास होत आहेत. सर्व यंत्रणा गप्प आहे. आमचे काही जवळचे पोलीस आहेत, त्यांनी आम्हाला सर्व माहिती दिली आहे, असा खळबळजनक आरोपही अनिल परब यांनी यावेळी केला.पक्षांतर बंदी आणि आमदार अपात्र प्रकरणी न्यायालयात तारीख पे तारीखचा जो सिलसिला सुरू आहे यावर अनिल परब यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.शिवसेना व महाविकास आघाडीची भूमिका सांगत असताना परब म्हणाले, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे आश्वासन महायुतीने दिले होते. त्यासाठी पंतप्रधान मोदींना मुंबईत बोलून जलपूजन केले गेले. या स्मारकाची एक वीटही उभारली गेलेली नाही. महाराजांच्या हा अवमान शिवप्रेमी सहन करणार नाही आणि म्हणूनच महाराजांची प्रेरणा तरुणापर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर उभारण्याचे वचन उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे परब म्हणाले.

लाडकी बहीण योजनेला विरोध नाही मात्र लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यावर यांना लाडकी बहीण आठवली. हे नाटक जनता विसरणार नाही. आम्ही लाडक्या बहिणीला ३००० रुपये देणार आहोत. बेरोजगार तरुणाला ४००० हजार देणार आहोत आणि हे निर्णय विचारपूर्वक घेतले असल्याचेही ते म्हणाले. कोणत्याही पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर पातळी सोडून टीका करणे योग्य नाही, त्यासाठी एका आचारसंहितेची गरज असल्याचे प्रतिपादन परब यांनी यावेळी केले. आमच्या घरात चोरी नाही डाका पडला आहे. उध्दव ठाकरे आता घर सावरायला लागलेत थोडा वेळ लागेल. चोर आणि पोलीस एकत्र आल्यावर न्याय मिळवणं थोडे कठीण जात आहे. मात्र जनतेने यांचे सर्व खेळ ओळखले आहेत, अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर केली.शिवसेना पक्ष व चिन्ह ही फक्त बाळासाहेबांची प्रॉपर्टी होती या राज ठाकरेंच्या टिकेचा समाचार घेताना अनिल परब यांनी बाळासाहेबांचे मृत्यूपत्र अंमलात आणण्यासाठी बाळासाहेबांनीच माझी वकील म्हणून नेमणूक केली होती. त्यात बाळासाहेबांनी असं स्पष्ट म्हटलंय. या मृत्यूपत्रात लिहिलेले आणि न लिहिलेली जी माझी प्रॉपर्टी आहे ती उद्धव ठाकरेंची आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे उद्धव ठाकरे हेच खरे वारसदार असल्याचे प्रतिपादन अनिल परब यांनी केले.गिरणी कामगारांना न्याय देणारी एकमेव शिवसेना आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, असा विश्वास परब यांनी यावेळी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button