
घरात घुसून वृद्धेचे दागिने लुबाडले.
कणकवली:- हरकुळ बुद्रुक-जंगमवाडी येथील जंगमेश्वर मंदिरानजीक राहणार्या श्रीमती मालिनी शाम पाटकर (87) या वृद्धा घरात जपमाळ घेऊन नामस्मरण करत बसल्या असताना दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून त्यांचे तोंड रुमालाने दाबत गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची माळ खेचून पोबारा केला.मालिनी पाटकर यांनी जोरदार प्रतिकार करत ओरड मारल्याने चोरटे घराच्या परिसरात चपला टाकून पळून गेले. यात मालिनी पाटकर यांच्या ओठाला दुखापत झाली आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी 2 वा.च्या सुमारास घडली. दुपारी 2 वा.च्या सुमारास दोन अनोळखी तरुण अचानकपणे मालिनी पाटकर यांच्या घरात घुसले. काही कळायच्या आत चोरट्यांनी पाठीमागून येऊन रुमालासारख्या फडक्याने मालिनी यांचे तोंड दाबत गळ्यातील सोन्याची माळ खेचली.या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.