अख्खी भाषा घाणेरडी करुन टाकणारा एक ‘भिकार संपादक’ इकडे राहतो –
संजय राऊत यांच्यावर राज ठाकरे यांची टीका
भांडूपमध्ये राहणाऱ्या राऊत यांचा थेट उल्लेख न करता शुक्रवारच्या सभेतून राज ठाकरेंनी त्यांना टोला लगावला. “अख्खी भाषा घाणेरडी करुन टाकणारा एक ‘भिकार संपादक’ इकडे राहतो. त्याला वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आहोत. आमचा जेनेटीक प्रॉब्लेम आहे. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहे. ते शोले म्हणजे होतं ना तुम दो मारो हम चार मारेंगे! कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. याला वाटतं आमच्याकडे तोंड नाहीयेत. आमचं जर तोंड सुटलं ना… त्यांना कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ XX समजू नये यांनी,” असं म्हणत राज यांनी थेट उल्लेख न करता राऊतांना विक्रोळीच्या सभेतून आव्हान दिलं.
पत्रकारांनी यावरुनच संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, “राज ठाकरे बोलत आहेत? बोलू द्या ना! भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागणारा माणूस दुसरं काय बोलू शकतो?” असा प्रतिप्रश्न केला. तसेच पुढे बोलताना, “जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही म्हणतो, जे महाराष्ट्राची लूट करत आहेत त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्या आहे. ज्या शत्रूला जी भाषा समजते त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे. भाषेचा शुद्ध, आणि तुपातली भाषा कोणासाठी वापरायची महाराष्ट्राच्या शत्रूसाठी?” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.