आमदार अपात्रता सुनावणी नवीन खंडपीठाकडे जाणार?
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवल्यानंतर सुप्रीम कोर्टात दाखल असलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी नवीन खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे. न्या. चंद्रचूड हे ११ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत या प्रकरणाची सुनावणी होणे अशक्य दिसत आहे.या प्रकरणावर गेल्या काही महिन्यांपासून कोणतीही सुनावणी झाली नाही. सरन्यायाधीश पुढील आठवड्यात निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी ते या प्रकरणाचा निकाल देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अजूनही या याचिकेवर सुनावणी होऊ न शकल्याने न्या. चंद्रचूड यांच्या पीठासमोरील सुनावणीची शक्यता जवळजवळ मावळली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ३९ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले नव्हते, ज्याविरोधात ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शिंदे गटाचे आमदार भारत गोगावले यांनी या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी, अशी मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी सुप्रीम कोर्टातच होईल, असा निर्णय दिला होता.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्यात संघर्ष निर्माण झाला. शरद पवार यांच्या गटानेही अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभाध्यक्षांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. जयंत पाटील यांच्या माध्यमातून याप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.