शरद पवार यांच्यावरील टीकेमुळे संतापलेल्या अजित पवारांनी सदाभाऊ खोत यांना खडे बोल सुनावले.
शेतकरी नेते आणि महायुतीमधील घटक असलेले सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना त्यांच्या शारिरीक व्याधींवर भाष्य केले. भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या निवडणूकप्रचार सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांच्या जीभेवरील नियंत्रण सुटले.त्यांच्या या वक्तव्यावर टीका होऊ लागली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या टीकेवरून संताप व्यक्त केला. संतापलेल्या अजित पवारांनी सदाभाऊ खोत यांना खडे बोल सुनावले.अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्या टीकेचा समाचार घेतला. अजित पवारांनी म्हटले की, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं, सुसंस्कृतपणे कसं बोलायचं असतं, कंबरेखालचे वार कसे करायचे नसतात, याचे उदाहरण घालून दिलेले आहे. काही आरोप-प्रत्यारोप होत असतात. परंतु ते मांडण्याची एक पद्धत असते. तेच आपल्याला त्यांनी शिकवलेलं आहे.अजित पवार यांनी म्हटले की, मी तीव्र शब्दात खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्याच ट्विट ही केलं आहे. त्यांना फोन करूनही सांगितले आहे. तुम्ही केलेले हे स्टेटमेंट आम्हाला कुणालाही आवडले नाही, तुम्ही हे बंद करा वैयक्तिक कुणाच्या विषयी बोलणं आपल्याच पद्धत नाही, त्याबद्दल मी फोनवरच सदाभाऊंचा निषेध केला असल्याचे अजित पवारांनी सांगितले.अजित पवारांनी पुढे म्हटले की, तुम्हाला जी भूमिका मांडायची आहे ती मांडा. तुमची विचारधारा इतरांची विचारधारा वेगळी असू शकते, मतमतांतर असू शकते. मात्र, ताळमेळ ठेवून बोललं पाहिजे. हा निंदनीय प्रकार असून विनाशकाली विपरीत बुद्धी सारखा प्रकार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. असली वक्तव्ये महाराष्ट्र खपवून घेत नसल्याचेही अजित पवारांनी म्हटले.*सदाभाऊ खोत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त.*..भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावरून सदाभाऊ खोत यांना सुनावलं. आता या प्रकरणी सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना माझ्या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखाववल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.