यापुढे एकजरी बॅनर लावला तर तेलींना पळताभुई थोडी करू-संजू परब.
महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्याविरोधात लावलेला ‘तो’ बॅनर हा विरोधी उमेदवार राजन तेली यांच्याकडून लावण्यात आला आहे.रात्रीच्या वेळी दरोडेखोरासारखे चोरी छुपे बॅनर लावायची सवय ही तेलींनाच आहे. त्यामुळे यापुढे मतदारसंघात एकजरी बॅनर दिसला तर आम्ही असे बॅनर लावू की तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांनी यावेळी दिला. सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, तेलींना मी अनेक वर्षे ओळखतो. समोर येऊन लढण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे ते अंधारात लहान मुलांसारखे अशी बालीशकृत्ये करत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी जाहीरपणे आरोप करावेत त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. राणेंच्या विरोधात लावलेला हा शेवटचा बॅनर आहे. यापुढे एकजरी बॅनर लावला तर तेलींना पळताभुई थोडी करू, असा इशाराही संजू परब यांनी दिला.