सौदी अरेबियात प्रथमच झाली चक्क बर्फवृष्टी!
सहारा वाळवंटाच्या मोरोक्को, अल्जेरियासारख्या देशांमधील भागात सप्टेंबरच्या अखेरीस मुसळधार पाऊस होऊन गेल्या अर्धशतकापासून कोरडी असलेली तळी भरली होती. सहाराच्या काही भागात हिमवृष्टी झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत.केवळ सहारा वाळवंटातच नव्हे, तर जगाच्या अन्य भागांतही निसर्गाचे अनोखे रूप पाहायला मिळत आहे. आता सौदी अरेबियाच्या इतिहासात प्रथमच चक्क बर्फवृष्टी झाली आहे. सौदी अरेबियातील वाळवंटातील काही भागांत पाऊस आणि बर्फवृष्टी पाहायला मिळाली. त्यामुळे पहिल्यांदाच वाळवंटातील वाळूवर बर्फाचा थर पाहायला मिळाला आहे. सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागातील अल ज्वाफमध्ये हा प्रकार घडला. सौदी अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशात प्रचंड बर्फवृष्टी झाली आणि असं हे पहिल्यांदाच घडलं आहे. म्हणजे ज्या पर्वतीय वाळवंटी भागात आतापर्यंत एकदाही बर्फवृष्टी किंवा गारपीट झाल्याची नोंद नाही, तिथं आता बर्फाची चादर पसरली आहे. सौदीच्या उत्तरेकडील अल ज्वाफ भागात घडलेल्या या घटनेने अनेक लोक थक्क झाले. गेल्या काही दिवसांपासून सौदीच्या काही भागांत सोसाट्याच्या वार्यासह गारपीट होत आहे; पण थेट मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळेच हवामान तज्ज्ञही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सोबत हवामान बदलाचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.