सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड यांच्या कार्यकाळात शिवसेना पक्षाचे चिन्ह प्रकरणाचा निकाल येणार नाही.
शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणीची संभाव्य तारीख १८ नोव्हेंबरला आहे. दरम्यान, ८ नोव्हेंबर हा तांत्रिकदृष्ट्या विद्यमान सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांचा सर्वोच्च न्यायालयातील कामाचा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आता सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड यांच्या कार्यकाळात शिवसेना पक्षाचे चिन्ह प्रकरणाचा निकाल येणार नाही, हे स्पष्ट झाले. तसेच आता नव्या खंडपीठाकडे हे प्रकरण जाणार असल्यामुळे याचे निकाल पुढच्या वर्षात येण्याची शक्यता आहे. मंगळवारी सकाळपर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीसाठीची संभाव्य तारीख ८ नोव्हेंबर होती. त्यामुळे ८ नोव्हेंबरला या प्रकरणावर सुनावणी होते का, याची सर्वांना उत्सुकता होती. दरम्यान, ८ नोव्हेंबरला सुनावणी होणाऱ्या प्रकरणांची यादी मंगळवारी संध्याकाळी प्रसिद्ध झाली. यामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाचा समावेश नाही. त्यामुळे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी आता होणार नाही आणि निकालही येणारनाही हे स्पष्ट झाले.