
शेतकर्याने फळ समजून ज्वालाग्रही पदार्थ उचलल्याने तो हातात फुटून गंभीर दुखापत
पावस:- रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले घवाळीवाडी येथे गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकर्याने फळ समजून ज्वालाग्रही पदार्थ उचलल्याने तो हातात फुटून गंभीर दुखापत झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली.या दुर्घटनेत मनीष धोंडू घवाळी (वय 53) हे जखमी झाले.डोर्ले येथील मनीष धोंडू घवाळी हे सकाळच्या सुमारास गुरे चारण्यासाठी गेले होते. यावेळी तेथील सड्यावर त्यांना एक फळसद़ृश पदार्थ दिसल्याने त्यांनी ते उचलले. तो ज्वालाग्रही पदार्थ असल्याचे लक्षात येताच घवाळी यांनी तो फेकण्याचा प्रयत्न केला असता तो हातामध्ये फुटल्याने उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर जखमी झालेल्या घवाळी यांना तातडीने रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. ज्वालाग्रही पदार्थ सापडल्याने डोर्ले परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरामध्ये डुकराचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने शिकारीसाठी हा ज्वालाग्रही ठेवण्यात आला असावा, असे बोलले जात आहे. हा प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याने पोलिस त्याचा तपास करीत आहेत.