राजापूर वैष्णवी माने मृत्यूप्रकरणी मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल.
राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल संचालित सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात नवरात्रौत्सवा दरम्यान प्रशालेत सरस्वती पूजनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या गरबा नृत्य कार्यक्रमात खेळताना चक्कर येऊन पडल्याने मयत झालेल्या अजिवली गावची मानेवाडी येथील कुमारी वैष्णवी माने हिच्या मृत्यू प्रकरणी वडील प्रकाश लक्ष्मण माने यांनी राजापूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार पाचल येतील सरस्वती विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी देसाई यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजापूर तालुक्यातील आजिवली मानेवाडी येथील वैष्णवी प्रकाश माने ही पाचल येथील सरस्वती विद्यामंदिर या प्रशालेत इयत्ता अकरावी मध्ये शिकत होती. नवरात्रोत्सवात दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी सरस्वती पूजनाच्या निमित्ताने शाळेत गरबा नृत्य खेळत असताना चक्कर येऊन पडल्याने वैष्णवी हिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान गरबा नृत्याचा कार्यक्रम दुपारी दोन वाजता कडक उन्हामध्ये प्रशालेच्या उघड्या मैदानात खेळण्यात आला होता. त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय देखील नव्हती तसेच सदर कार्यक्रमासाठी मोठ्या आवाजाचा डीजे लावण्यात आला होता.कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्याध्यापक तसेच शिक्षक यापैकी कोणीही उपस्थित नव्हते.प्रचंड कडक उन्हाच्या झळा आणि डीजेच्या आवाजामुळे माझी मुलगी वैष्णवी ही खेळताना मैदानात खाली कोसळली त्यावेळी तिच्या मैत्रिणींनी आरडा ओरडा करून गाडी आणा व वैष्णवीला हॉस्पिटलला न्या असे सांगितले, मात्र ती जवळपास दहा मिनिटे मैदानावर उन्हात पडून होती. तेथूनच तिला डॉक्टर कडे नेले असते तर ती वाचली असती.शाळेच्या शेजारीच डॉक्टर आहेत तसेच पाचल मध्ये देखील खाजगी डॉक्टर आहेत परंतु तिला उचलून शाळेच्या हॉलमध्ये नेले गेले.तेथून सुमारे 20 ते 30 मिनिटे तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळेस मुख्याध्यापक तानाजी देसाई यांनी तिला चक्कर आली आहे ती थोड्यावेळाने बरी होईल असे सांगून दुर्लक्ष केले.सुमारे 40 मिनिटानंतर तिला शिक्षकांच्या गाडीतून ग्रामीण रुग्णालयात नेले.रुग्णालयात नेल्यावर सुद्धा डॉक्टर दहा ते पंधरा मिनिटे रुग्णालयात उशिराने आले तिचा श्वास गुदमरल्याने तिला तात्काळ ऑक्सिजनची गरज असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करायचे सोडून 108 नंबर फोन केला असे सांगून दिरंगाई केली.शाळेतील मुख्याध्यापक यांनी संवेदनशीलता दाखवून वेळीच डॉक्टरांकडे नेले असते तर माझ्या मुलीचा जीव गेला नसता.मुख्याध्यापकांच्या कुचराईमुळे माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचे वडील प्रकाश लक्ष्मण माने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे