फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन आणि युवा परिवर्तन अकादमीतर्फे कौशल्य विकास केंद्र सुरू.

गेल्या दोन दशकांपासून  फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन समाजाची सेवा करण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य सेवा, शिक्षण, जलसंधारण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास कार्यक्रम या क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. यातच फिनोलेक्स कौशल्य विकास केंद्र मागील काही वर्ष महिलांसाठी शिवणकाम वर्गाचे काम करीत आहे.

महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने, आज फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने ग्रामीण भागातील महिलांना स्किल इंडिया आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत उच्च दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या युवा परिवर्तन अकादमीसोबत सामंजस्य करार केला आहे. या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन आज गोळप व फणसोप ग्रामपंचायत कार्यालयात गटविकास अधिकारी विजय पोकळे कमलाकर साळवी, पूर्णगडचे उपसरपंच प्रकाश पवार, भाट्ये, फणसोपचे ग्रामसेवक, कोळंबे ग्रामपंचायतीच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन कार्यक्रमासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन आणि युवा परिवर्तन अकादमीच्या महिला आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा परिवर्तन सोबत सुरवातीला भाट्ये, फणसोप, कोळंबे, गोळप, पावस, पूर्णगड आणि शिरगाव या सात ग्रामपंचायतींसाठी काम करणार आहेत . या कौशल्य विकास केंद्रांतर्गत वरील सात गावांमध्ये नर्सिंग सहाय्यक,  ब्युटीशियन, बॅग मेकिंग, केटरिंग, प्लंबिंग, वायरमन, भाजीपाला शेती असे विविध अभ्यासक्रम दिले जाणार आहेत.

हा एक नवीन उपक्रम आहे. सर्व सात ग्रामपंचायतींनी ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणासाठी हा अभ्यासक्रम यशस्वी करण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन आणि युवा परिवर्तन यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील या कौशल्य विकास उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत सदस्य, महिला आणि ग्रामस्थांना खूप आनंद झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button