बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी

गुजरातच्या आनंद जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातील बांधकाम सुरू असलेला एक पूल कोसळून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल व आनंद पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं. आतापर्यंत चार मजुरांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. तसेच या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनएचएसआरसीएल बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम करत आहे. एनएचएसआरसीएलने या घटनेनंतर एक निवेदन देखील जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की आनंद येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी काँक्रीटचे ब्लॉक कोसळले आहेत. या दुर्घटनेनंतर आम्ही मदत व बचावकार्य हाती घेतलं आहे. आनंद पोलील व अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचाव मोहीम सुरू केली आहे. आम्ही बचाव मोहीमेवर लक्ष ठेवून आहोत. बचाव पथकाला लागणारी सर्व प्रकारची मदत तातडीने पुरवली जाईल.सोमवारी सायंकाळी माही नदीवर बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणारे काही कामगार काँक्रीट ब्लॉकखाली अडकले. क्रेन व उत्खनन यंत्रांच्या सहाय्याने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. काही मजुरांना काँक्रीट ब्लॉक्सच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश मिळालं आहे. या मजुरांना रुग्णालयात दाखल केलं आहे. तसेच या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई व गुजरातमधील अहमदाबाद या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने चालू असून आता प्रकल्पातील स्थानकांच्या कामालाही वेग आला आहे. गुजरातमधील पाच स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात असून महाराष्ट्रातील तीन स्थानकांच्या कामाला सुरुवात झाली आहे. बोईसर, विरार स्थानकांची पायाभरणी सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमण येथे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. तर, गुजरातमध्ये आठ आणि महाराष्ट्रात चार अशी एकूण १२ स्थानके बांधण्यात येणार आहेत. त्यात, वांद्रे – कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. या सर्व स्थानकांची कामे सुरू असून ती वेगाने करण्याचा निश्चय करण्यात आला आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ( एनएचएसआरसीएल) वतीने सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button