परशुराम चिपळूण येथे होणार संस्कृतभारतीचे प्रांतसंमेलन : ९, १० नोव्हेंबर रोजी आयोजन.
संस्कृतभारतीच्या कोंकणप्रांताचे संमेलन यावर्षी दिनांक ९ व १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत श्री क्षेत्र परशुराम येथील एस.पी.एम. इंग्लिश मिडियम स्कूल, परशुराम, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई ते गोवा या कोकणप्रांतातील संस्कृतशिक्षक, संस्कृतभाषेची सेवा करणारे सुमारे ३०० कार्यकर्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत. एस.पी.एम. इंग्लिश मिडियम स्कूल व संस्थान श्री भार्गवराम परशुराम न्यासाच्या महत्त्वपूर्ण सहयोगातून हे संमेलन आयोजित होत आहे.
*विविध प्रदर्शने: या संमेलनामध्ये विज्ञानप्रदर्शिनी, वस्तुप्रदर्शिनी, भारतीयज्ञानप्रदर्शिनी, अर्थशास्त्रप्रदर्शिनी, अशा वैविध्यपूर्ण गोष्टींसोबतच उद्बोधक सत्रे व सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. त्याचप्रमाणे कार्यकर्ता विकास, संस्कृतमधील प्रेरक कथा, इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. चिपळूण येथील प्रसिद्ध प्रवचनकार श्री. धनंजय चितळे यांच्या हस्ते या प्रदर्शिनीचे उद्घाटन होणार आहे.
*विशेष उद्बोधन: संस्कृतभाषा ही भारतीय संस्कृतीची वाहिका आहे. भारतीय संस्कार या भाषेच्या अध्ययनाने सहजपणे समाजात रुजतात. संस्कारयुक्त कुटुंब हा समाजाचा कणा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने कर्नाटक राज्यातील उच्च शिक्षण विभागाचे निवृत्त संचालक प्रो. टी. एन. प्रभाकर यांचे ‘कुटुंबप्रबोधन’ या विषयावर विशेष उद्बोधन या संमेलनात होणार आहे.
*सांस्कृतिक कार्यक्रम: याच संमेलनात दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:४५ ते ९:०० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमात चिपळूण येथील स्थानिक कलाकार संस्कृत गीते सादर करणार आहेत. यामध्ये संस्कृत स्तोत्रे, अनुवादित गीते, राष्ट्रभक्तीपर गीते व बालगीतांचा समावेश आहे.
*स्वागतसमिती: या संमेलनासाठी चिपळूण येथील अग्रगण्य व्यक्तींनी पुढे येत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी स्वागत समितीत सहभागी होण्यास तयारी दर्शवली आहे. संस्थान श्री भार्गवराम, परशुराम चे अध्यक्ष अॅड. जीवन रेळेकर हे या स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत तर श्री. प्रशांत पटवर्धन हे या स्वागत समितीचे उपाध्यक्ष आहेत. डी.बी.जे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. माधव बापट उद्घाटक म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून ते स्वागत समिती सदस्य देखील आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका सौ. शीला केतकर, विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल, शिरळ प्रकल्प समिती सह कार्यवाह डॉ. अश्विनी तेजानंद गणपत्ये, प्रवचनकार श्री. धनंजय चितळे व आय्.एम्.एस.सी.सी.आर्. च्या समन्वयक सौ. अर्चना बक्षी या सर्व प्रतिष्ठित व्यक्ती स्वागत समिती सदस्य आहेत.संस्कृतभारती ही संस्कृत भाषेसाठी शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी एक विश्वव्यापी संस्था आहे. संस्कृतभाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे व भारतीय संस्कृतीचे जतन करणे ह्या उदात्त हेतूने संस्कृतभारती काम करते. संस्कृतभारतीच्या कार्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे दर तीन वर्षांनी होणारे प्रांतसंमेलन. प्रांतसंमेलनाच्या निमित्ताने मुंबई ते गोवा या कोकणपट्ट्यातील संस्कृतशिक्षक, संस्कृतभाषेची सेवा करणारे कार्यकर्ते एकत्र येतात.