ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून पक्षचिन्हाबाबत अजित पवारांना आदेश ६ नोव्हेंबर

नवी दिल्ली*:  राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुमी सुरू आहे. परंतु, दोन पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे पक्षचिन्हावरून वाद सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने घड्याळ चिन्हाच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावरून आता सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला येत्या ३६ तासांत अस्वीकरण पत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती मिळत आहे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष अजित पवार यांनी बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले की ३६ तासांच्या आत मराठी दैनिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घड्याळ चिन्हाबाबत अस्वीकरण प्रसिद्ध केले जाईल. घड्याळ चिन्हाबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, निवडणुकीच्या काळात न्यायप्रविष्ट असलेलं घड्याळ चिन्ह वापरलं जात आहे, असं या अस्वीकरण पत्रकात असेल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तोंडी निर्देशाला उत्तर देताना अजित पवार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी हे आश्वासन दिले.आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने दाखल केलेल्या अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. या अर्जाद्वारे शरद पवार यांनी अजित पवार यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली.लोकसभा निवडणुकीपूर्वी १९ मार्च आणि ४ एप्रिल रोजी न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसला सर्व प्रचार सामग्रीमध्ये ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर खटल्याच्या निकालाच्या अधीन असल्याचे अस्वीकरण समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. शेवटच्या सुनावणीत (२४ ऑक्टोबर) न्यायालयाने अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीसाठीही पूर्वीचे आदेश पाळले जातील, असे हमीपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. पुढे, खंडपीठाने तोंडी इशारा दिला की जर त्यांच्या आदेशांचे उल्लंघन केले गेले तर कारवाई केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button