अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, भारतीय वंशाच्या कमला हॅरीस पराभूत!
जागतिक महासत्ता अमेरिकेच्या चाव्या नेमक्या कुणाच्या हाती जाणार, याची गेल्या महिन्याभरात जोरदार चर्चा पाहायला मिळाली. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे पडसाद जगभरात उमटणं साहजिक असून त्यानुसार अवघ्या जगाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं.*भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेत मतदानाला सुरुवात झाली. बुघवारी पहाटे मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी १ च्या सुमारास निकाल स्पष्ट झाले. रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेत बहुमत मिळालं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमत मिळालं आहे. ओहियोमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य शेरॉड ब्राऊन यांचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बर्नी मोरेनो यांच्याकडून पराभव झाला. त्याआधी वेस्ट व्हर्जिनियाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिम जस्टिस यांनी सहज विजय मिळवल्यानंतर या दोन जागांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया आणि मिशिगन या ठिकाणी डेमोक्रॅटिक पक्षाकडून कडवी झुंज पाहायला मिळाली.