मधुरीमाराजे यांचा अर्ज मागे घेताच सतेज पाटील भडकले.
कोल्हापूर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचा पंजा हे चिन्हच गायब झालं आहे, कारण उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी मधुरिमाराजे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचं तिकीट कापून राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती, पण अवघ्या काही तासात राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे यांना काँग्रेसने तिकीट दिलं.उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी बाकी असताना मधुरिमाराजे यांनीच कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूर उत्तरच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. मधुरीमाराजे यांचा अर्ज मागे घेताच सतेज पाटील भडकल्याचं समोर आलंय. शाहू महाराज आणि सतेज पाटलांमध्ये मधुरिमाराजेंच्या उमेदवारांवरून वाद झाला आहे.मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. यानंतर काँग्रेस नेते सतेज पाटील चांगलेच संतापले. दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली? लढायचं नव्हतं तर उमेदवारी का घेतली, मी माझी ताकद दाखवून दिली असती, असं सतेज पाटील शाहू महाराजांना म्हणाले.लाटकर हे पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांची नाराजी पक्षाला परवडणार नाही, असे सांगून मधुरीमाराजे यांनी माघार घ्यायचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली आहे.