सुकीवली येथील दुर्गप्रेमी मुलांनी साकारली राजगड किल्ल्याची प्रतिकृती
खेड : वार्ताहर खेड तालुक्यातील सुकीवली येथील दुर्गप्रेमी मित्र परिवाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगड किल्ल्याची अत्यंत सुबक आणि देखणी प्रतिकृती आपल्या कल्पकतेतून साकारली आहे. राजगड किल्ल्याची ही प्रतिकृती साकारण्यासाठी या दुर्गप्रेमी मित्रांना तब्बल चार दिवस परिश्रम घ्यावे लागले आहेत. साधारणपणे 13 बाय 9 लांबी रुंदीची राजगड किल्ल्याची ही प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. राजगड किल्ला बनवण्यासाठी तीन दुर्गप्रेमी मुलानी परिश्रम घेतले आहेत. यातील साहिल महेश चाळके, श्रेयस महेश चाळके आणि इमरान शेख सर्व राहणार सुकीवली किंववाडी या तीन दुर्गप्रेमीं मुलांनी आपल्या सुपीक कल्पनेतून राजगड किल्ला तयार केला आहे. विशेष म्हणजे या मुलांनी तयार केलेला हा राजगड किल्ला पाहण्यासाठी सुकीवली गावातील काही दुर्गप्रेमी मुलांसह ग्रामस्थांनी देखील भेट दिली आहे. छोट्या मुलांच्या या कल्पकतेला गावातील ग्रामस्थांसह तालुक्यातील काही प्रमुख नागरिकांनी देखील दाद दिली आहे. या मुलांचे विशेष कौतुक केले जात आहे.