दापोली विधानसभेत भाजपा महायुतीचेच काम करणारप्रदेश भाजपाचे युवा नेते अक्षय फाटक.
रत्नागिरी भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात आम्ही योगेश कदम यांचे काम करणार नाही शिवसेनेचे उमेदवार म्हणून आम्हाला ते मान्यच नाहीत अशा स्वरूपाची भूमिका काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मांडली होती. त्यामुळे राज्यात जरी युती असली तरी या मतदारसंघात स्थानिक भाजप व शिवसेना यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर आता निवडणुका जाहीर होऊन महायुतीमधून शिवसेनेचे उमेदवार दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम निश्चित झाले आहेत त्यांची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अशातच नेमकी भाजपाची भूमिका काय याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या सगळ्या विषयावर आता भाजपाचे प्रदेशचे युवा कार्यकारिणी सदस्य व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवामोर्चाचे सहप्रभारी अक्षय फाटक यांनी आम्ही महायुतीचेच काम करणार आहोत कोणीही महायुतीच्या विरोधात काम करणार नाही दापोली भाजपाही महायुतीचेच काम करणार असल्याची अशी स्पष्ट व रोखठोक भूमिका मांडली आहे. पक्षशिस्तीच्या विरोधात जाऊन काम करण्याचा भाजपचा संस्कार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता दापोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्येच मत मतांतर आहेत का ? समन्वयाचा अभाव आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कोकणामध्ये भाजपा म्हणून पाहायचं झालं तर शंभर टक्के आमच्यावर अन्याय झाला पण याचा अर्थ असा नाही की आम्ही महायुतीचं काम करणार नाही. स्थानिक पातळीवर काही मतमतांतर असतील काही वाद असतील तर ते नैसर्गिक आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते त्यामुळे प्रत्येकाने आम्हाला महायुतीचे काम करा आपल्याला चांगला विकासाचा व्हिजन असलेल महायुतीचे सरकार सत्तेवर आणायच आहे तुमच्या कोणाचा कुणाजवळ पटत असो अथवा नसो असं काहीतरी असलं तरी तत्कालीन वाद बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचेच काम करायच आहे अशी स्पष्ट भूमिका मांडली असून ते स्वाभाविक आहे असेही फाटक म्हणाले.आमचे राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कोकणचे नेते रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला महायुतीचे सरकार सत्तेवर आणायच आहे महायुतीचे काम करा असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्यासाठीच प्रचाराचे काम करत असल्याची स्पष्ट भूमिका अक्षय फाटक यांनी मांडली आहे. राज्यात महायुती म्हणून निर्णय झाल्यानंतर आता अजितदादांची राष्ट्रवादी किंवा भाजपा कोणाचं काम करणार हा प्रश्नच खरतर उद्भवत नाही असेही युवा नेते अक्षय फाटक यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत त्यांना विचारला असता ते म्हणाले की केदार साठे आमचे वरिष्ठ आहेत त्यांची एक काम करण्याची आक्रमक पद्धत आहे तसेच शिवसेनेचे रामदास कदम हे राज्याचे मोठे नेते आहेत. त्यामुळे या दोघांमधील शीतयुद्धावर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की या विषयावर बोलण्याइतका मी मोठा नाही मात्र आमची भाजपाची भूमिका ही प्रथम राष्ट्र प्रथम नंतर पक्ष व नंतर मी अशी आमची टॅग लाईन आहे. त्यामुळे या सगळ्याचा महायुतीचा निर्णय होईपर्यंत कोणीही मत मांडली असतील तर तो प्रत्येकाचा मतं मांडण्याचा अधिकार आहे. निवडणुकीत महायुती झाली आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर मला वाटत नाही की भाजपामधील कोणीही पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या निर्णयाविरोधात काम करतील असेही स्पष्ट मत अक्षय मत फाटक यांनी व्यक्त केल आहे. इतकच नाही तर जिल्हाध्यक्ष केदार साठे व तालुकाध्यक्ष संजय सावंत यांनीही आम्हाला कधी महायुतीचा विरोधात काम करा असं कधीही सांगितलं नाही आणि सांगणारही नाहीत असेही फाटक यांनी स्पष्ट केलं.भाजप हे कुटुंब आहे आमचे जिल्हाध्यक्ष केदार साठे आहेत तालुकाध्यक्ष संजय सावंत आहेत. कुटुंबामधील जे काही वाद असतील काही तक्रारी असतील तर त्या बाहेर करण्याची खरी तर आवश्यकता नाही. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजपा युती होणार नाही आम्ही योगेश कदम यांचे काम करणार नाही अशा स्वरूपाची भूमिका काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी थेट पत्रकार परिषदेत मांडली होती. आता या सगळ्या विषयावरून भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अक्षय फाटक यांनी महायुती बाबत स्पष्ट व रोखठोक भूमिका मांडत दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपमधील वाद आता मिटल्याचेच स्पष्ट संकेत दिले आहेत. यानंतर आता भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे कोणती भूमिका मांडतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.