
जुन्या काळातील फार्मासिस्ट कमलाकर जोशी यांचे निधन.
रत्नागिरी : शहरातील जुन्या काळातील फार्मासिस्ट आणि फुणगूस गावचे सुपुत्र कमलाकर एकनाथ जोशी (वय ८६) यांचे शुक्रवार १ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर चर्मालय येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी समाजातील विविध थरांतील नागरिक उपस्थित होते.कमलाकर जोशी हे धार्मिक वृत्तीचे आणि मनमिळावू स्वभावाचे होते. अतिशय विनम्र असा त्यांचा स्वभाव होता. रत्नागिरीतील प्रसिद्ध श्रीकृष्ण औषधालयामध्ये जवळपास ६० वर्षे त्यांनी फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होते. ते अनेकांना सुपरिचित होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. दोन दिवस त्यांना खासगी रुग्णालयात अधिक उपचारांसाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.कमलाकर जोशी यांच्या निधनाचे वृत्त कळताच जोशी पाळंद येथील त्यांच्या निवासस्थानी अनेकांनी धाव घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. शुक्रवारी दुपारी जोशी यांच्यावर चर्मालय येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नात, बहिणी, भाऊ असा मोठा परिवार आहे. माजी पत्रकार व पेटंट कन्सल्टंट अनिल आणि प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद यांचे ते वडिल होत.