आर्ट सर्कल, रत्नागिरीचा दोन दिवसीय सांगीतिक नजराणा
: सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणार्या आर्ट सर्कलच्या वतीने *दि.९ आणि १० नवेम्बर* रोजी सांगीतिक कार्यक्रम साकारत आहे. *दि. ९ रोजी, स्वरस्वप्न*, हा गुरू *स्वप्ना दातार* यांच्या संकल्पनेतून साकारलेला *व्हायोलिन वादनाचा* कार्यक्रम तर *दि. १० रोजी, स्वर आशा* हा आशा भोसले यांच्या चिरतरुण गाण्यांचा कार्यक्रम स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात *सायंकाळी ७ वाजता* सादर होणार आहे. शनिवारी दि. ९ रोजी सायंकाळी ७ वाजता होणार्या स्वरस्वप्नच्या निमित्ताने व्हायोलिन वाद्यवृंद अनुभवायला मिळणार आहे. व्हायोलिन हे अत्यंत नाजूक आणि स्वराला संवेदनशील वाद्य! त्यामुळे ते शिकणं आणि त्याचं सादरीकरण करणं हे शिवधनुष्य पेलण्याहून कमी नाही. परंतु मेहनतीने ही नजाकत देखील शिकता येते, याची प्रचिती देणारा हा सर्वांगसुंदर स्वर्स्वप्न! गुरू स्वप्ना दातार यांच्या शिष्यांच्या वादनातून विविध राग, उपशास्त्रीय संगीत याचसोबत भाव आणि सिने संगीत देखील या वाद्यवृंदामध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे सर्वसमावेशक असा हा व्हायोलिन वादकांचा मेळा चित्त हरपून टाकतो. नुसतीच करमणूक हा या सादरीकरणाचा उद्देश नसून गुरू स्वप्ना दातार यांच्या अनुभवी शब्दांमधून या वाद्यवृंदाची निर्मिती प्रक्रिया, मुलांची केलेली जडणघडण, त्यांच्यावर झालेले वादनाचे संस्कार याबद्दलही अधिक आणि नवीन माहीती मिळत राहते. देशातच नाही तर विदेशातदेखील रसिक या मुलांच्या वादनाने, मंत्रमुग्ध झाले आहेत. शास्त्रीय संगीताची श्रीमंती आणि सिनेसंगीताची आकर्षकता एकाच वेळी स्वरस्वप्नमधून अनुभवायला मिळणार आहे. शास्त्रीय संगीतामधील दिग्गज कलाकारांनी या बालचमूचं खूपच कौतुक केलं आहे. स्वरस्वप्नचा चकित करणारा अनुभव रसिकांना मिळणार आहे. दुसर्या दिवशी म्हणजे रविवारी दि. १० रोजी आशा भोसले यांच्या गीतांचा नजराणा *सोनाली कर्णिक, प्रीति जोशी आणि शमिका भिडे* या तीन गायिका ‘स्वराशा’मध्ये सादर करणार आहेत. *अमित गोठिवरेकर, प्रभाकर मोसमकर, सागर साठे, पंकज धोपावकर* हे वादक गाण्याला साथसंगत करणार आहेत. *अमित काकडे* यांच्या अभ्यासपूर्ण आणि खुमासदार निवेदनाने कार्यक्रमाला अधिक रंगत येणार आहे. आशा भोसले यांची गीतं म्हणजे हृदयाचा हळवा कप्पाच जणू…. भक्तिसंगीत- अभंगापासून ते पॉप म्युझिक पर्यंतचे सगळे गीतप्रकार आशा ताईंनी त्यांच्या कारकिर्दीत गायले आहेत. त्यातील निवडक पण अद्वितीय गीतं स्वराशामध्ये अनुभवता येणार आहेत. या सांगीतिक कार्यक्रमासाठी आर्ट सर्कलच्या वार्षिक सभासद आणि सन्माननीय प्रायोजक यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच, आपले वार्षिक सभासद किंवा प्रायोजक नसलेल्यांसाठी
देणगी मूल्य प्रवेशिका दि. ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृहावर उपलब्ध होणार आहेत.या दोन दिवसीय सांगीतिक उपक्रमाला रसिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन आर्ट सर्कलकडून. करण्यात आले आहे.