
खेड शहरातील ऐतिहासिक ठेवाकडे दुर्लक्ष.
खेड शहराच्या मध्यवर्ती भागात संरक्षित हरितपट्टा असून त्या पट्टयात पुरातन व पवित्र गरम पाण्यांचे कुंड आहे. या कुंडामध्ये असलेल्या पाण्याला महत्व प्राप्त झाले असून त्या भागाचा विकास करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केले. परंतू गेल्या १५ वर्षात या पवित्र कुंडाकडे सर्वच राजकीय पक्ष अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. परिणामी याठिकाणी समाजकंटकांनी तीर्थक्षेत्राला आपला अड्डा बनविले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था होत आहे. खेड शहराला प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक, वारसा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे शहरात पुरातन काळातील अनेक खुणा विविध ठिकाणी आढळून येतात. शहरातील खांबतळे, पुरातन लेणी, बंदर परिसर व तेथील शेकडो वर्षे जुन्या समाध्या, गरम पाण्यांचे कुंड, भैरी मंदिर आदी ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर त्याची साक्ष पटते. परंतू ही सर्वच ठिकाणे दुर्लक्षित व अविकसित राहिली आहेत.