अर्ज छाननीवेळी महायुती-ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांत जोरदार खडाजंगी
कुडाळ : येथे विधानसभा उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखाली तहसीलच्या प्रवेशद्वारावर महायुती आणि ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.दोन्ही गटांतील समजूतदार पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण शांत केले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढले. यामुळे काहीकाळ वातावरण तंग झाले होते.कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या अर्ज सुनावणीवेळी एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जाला आक्षेप घेण्यात आला. त्या उमेदवाराच्या एका सूचकाची सही खोटी मारल्याचा आक्षेप होता. त्याने ती सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी एक तासाचा वेळा दिला. त्याप्रमाणे ते प्रतिज्ञापत्र करण्यासाठी संबंधित सूचक तहसील कार्यालयात आले असता महायुतीच्या एका कार्यकर्त्याने त्याला आत जाण्यास विरोध करीत अडवीत धक्काबुक्की केली. मोठा आरडाओरडा ऐकून निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशेदेखील चेंबर सोडून तेथे आल्या. दरम्यान, पोलिसांनी सर्वाना बाहेर काढले. त्यानंतर मात्र तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.