
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळा धोकादायक स्थितीत ः शिक्षण सभापतींच्या दाव्याने खळबळ
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात सध्या अनेक जि.प. शाळांची अवस्था धोकादायक झाली असून या शाळांमध्ये मुलांना बसविणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण असल्याचे मत जि.प.चे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. या धोकादायक शाळांसाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी त्यांनी केली. पावसापूर्वी जिल्ह्यातील अनेक शाळा धोकादायक असल्याचा अहवाल शिक्षण खात्याकडे आला असून त्या शाळांच्या दुरूस्तीसाठी व वर्गखोल्यांसाठी ग्रामस्थ व जिल्हा परिषद सदस्यांकडून मागणी केली जात होती. रत्नागिरी जिल्ह्यातील अंदाजे २३७ वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. परंतु शासनानेच पुरेसा निधी न दिल्याने या वर्गखोल्या बांधता आल्या नाहीत.