दीपावलीनिमित्त जैन मंदिरात दिव्याची रोषणाई, रंगावली प्रदर्शनाचे आकर्षण. रंगावली प्रदर्शन सर्वधर्मियांसाठी खुले३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान पाहता येणार.
रत्नागिरी ता. ३० : अंधकार दूर करून तेजोमय प्रकाश पसरविणाऱ्या दीपावली सणानिमित्त शहरातील राम नाक्यावरील जैन मंदिरात उद्या दि. ३१ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस रंगावली प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वधर्मिय लोकांसाठी खुले राहणार आहे, जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले आहे.प्रख्यात रांगोळीकार राहुल कळंबटे यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या अप्रतिम रंगावली हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे. धार्मिक माहितीबरोबरच सामाजिक जाणीवा अधोरेखित करणाऱ्या या रंगावली रत्नागिरीकरांच्या पसंतीस उतरतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. दि. ३१ ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस संध्याकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन व जैन मंदिर रत्नागिरीतील सर्व धर्मिय नागरिकांसाठी व भाविकांसाठी खुले असणार आहे.रत्नागिरीतून जैन दीक्षा ग्रहण करुन साधू जीवन अंगिकारलेले पूज्य प्रभुप्रेमशेखर विजयजी महाराज व पूज्य योगदृष्टिशेखर विजयजी महाराज यांचा या वर्षीच्या चातुर्मासानिमित्त रत्नागिरीत मुक्काम आहे. त्यांच्याच प्रेरणेने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्याही दर्शनाचा लाभ सर्व धर्मिय भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाने केले आहे.