अमेरिकेतील पीएचडी सोडून ‘आयएएस’वर मोहोर अनिमिष वझे याचे यश; आयएएस निवड यादीत ८५वा क्रमांक

रत्नागिरी,दापोली ध्येयनिश्चिती, या ध्येयाप्रत जाण्यासाठी मेहनतीची तयारी आणि याला जिद्दीची जोड असा गुणांचा त्रिवेणी संगम झाला तर यशश्री नक्की मिळते हे मुरुडच्या अनिमिष वझे या कोकण सुपुत्राने दाखवून दिले आहे. अमेरिकेतील आपले पीएचडीचे शिक्षण सोडून भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दाखल होण्याचे ध्येय उराशी बाळगून अनिमिष भारतात परतला. २०२२पासून त्याने तयारी सुरू केली. यासाठी दिलेल्या स्पर्धा परीक्षेत त्याला मोठे यश आले. भारतीय प्रशासकीय सेवेत त्याची निवड झाली असून २५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या दुसऱ्या निवड यादीत त्याचा ८५वा क्रमांक आला आहे. कल्याण येथील खिडकी वडेवाले यांचे हे वझे कुटुंब मूळचे मुरुड येथील आहे. अनिमिष याचे पहिली ते इयत्ता सातवी हे प्राथमिक शिक्षण हे कल्याण येथील के.सी. गांधी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झाले. आठवीपासून ते बारावीपर्यंत त्याचे शिक्षण हे खेड येथील सीबीएससी बोर्डाच्या रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच विज्ञानाची आवड असलेल्या अनिमिषने यापूर्वी शाळा व महाविद्यालयामध्ये अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. बारावीनंतर त्याला कोलकाता येथील इंडियन सायन्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे प्रवेश मिळाला. कोलकाता येथील रिसर्च सेंटरमधून एम.एस. त्याने शिष्यवृत्तीद्वारे पूर्ण केले. रैणव जीवशास्त्र हा त्याचा विज्ञान शाखेतील अभ्यासाचा मुख्य विषय आहे. जर्मनीत जाऊन मॅक्स प्लँक महाविद्यालयात त्याने पुढील प्रशिक्षण घेतले. अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात अनिमिषची पीएचडीसाठी निवड झाली. मात्र अनिमिषचे मन तिकडे फार रमले नाही. सप्टेंबर २०२१च्या दरम्यान तो अमेरिका सोडून भारतात परतला. त्याचे वडील नीलेश, आई अमिता यांनी त्याच्या निर्णयाला पाठिंबा देत त्याला प्रशासकीय सेवेतील परीक्षेला प्रोत्साहन दिले. स्पर्धा परीक्षेसाठी त्यांन जयपूर हे सेंटर निवडले होते. यासाठी त्यांनी पूर्णपणे मोबाइल, सोशल मीडिया बंद ठेवला होता. एकच जिद्द बाळगून रोज आठ-दहा तास अभ्यास करून त्याने यश मिळवल्याची प्रतिक्रिया त्याचे वडील नीलेश यांनी दिली. ध्येय निश्चित करून, अभ्यास करत मेहनतीची तयारी ठेवली तर कोकणातल्या विद्यार्थ्यांना यश दूर नाही -अनिमिष वझे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button