शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी!

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु आहे. मात्र, अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असतानाच काही ठिकाणी मोठ्या घडामोडी घडत असून उमेदवार बदलले जात आहेत. यामध्ये काँग्रेसने कोल्हापूरमध्ये उमेदवार बदलला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) मोहोळ मतदारसंघात उमेदवार बदलला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सिद्धी रमेश कदम यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द करत त्यांच्या ऐवजी मोहोळमधून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मोहोळ तालुक्यातील काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सिद्धी कदम यांच्या उमेदवारीबाबत नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर मोहोळमध्ये उमेदवार बदलण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सांगितली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांच्या कन्या सिद्धी कदम यांना मोहोळमधून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत सिद्धी कदम यांची उमेदवारी अचानक रद्द करत मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अचानक उमेदवारी बदलण्यात आल्यामुळे मोहोळच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याबरोबरच जयंत पाटील यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र देत सिद्धी रमेश कदम यांच्या नावे देण्यात आलेला पक्षाचा एबी फॉर्म रद्द समजण्यात यावा, असं पत्र देण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून सिद्धी कदम यांना मोहोळमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महाविकास आगाडीच्याही काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली होती. तसेच या पदाधिकाऱ्यांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक सिद्धी कदम यांची उमेदवारी अर्ज रद्द करत त्यांच्या ऐवजी राजू खरे यांना उमेदवारी जाहीर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button