भाजपाचे नाराज चालले उबाठामध्ये, भाजपा नेत्या उल्का विश्वासराव यांचा पक्षप्रवेश.
भाजपाच्या राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी राजापूर येथे झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यक्रमात शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत त्या पक्षात प्रवेश केला.उल्का विश्वासराव गेली दहा वर्षे लांजा राजापूर तालुक्यात भाजपाच्या सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. लांजा आणि राजापूर या दोन्ही तालुक्यांतील पक्ष संघटना वाढीवर त्यांनी भर दिला होता. त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे या दोन्ही तालुक्यांत भाजपाची ताकद निश्चितच वाढली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उल्का विश्वासराव राजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक होत्या. मात्र पक्षनेतृत्वाकडून त्यांना डावलले गेल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी कालच आपल्या पदाचा राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त केला होता. त्यामुळे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर उल्का विश्वासराव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.