सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी -माजी खा. विनायक राऊत.
आरसीएस अंतर्गत सिंधुदुर्ग (चिपी) ते मुंबई अशी अलायन्स एअरची उड्डाणे नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे सचिव तथा माजी खा. विनायक राऊत यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत विनायक राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील एक प्रसिद्ध पर्यटन जिल्हा आहे. जिथे देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. याच जिल्हात दोन वर्षांपूर्वी चिपी विमानतळ सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील उड्डाण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाचा समावेश करण्यात आला, त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास सोपा झाला होता. तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सहकायनि ९ ऑक्टोबर २०२१ पासून चिपीविमानतळावरून सिंधुदुर्ग-मुंबई अशी अलायन्स एअरची विमानसेवा सुरू झाली. याचा पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिकांनाही मोठा फायदा झाला. मात्र विमान कंपनीने अलीकडेच जाहीर केले आहे की ते २६ ऑक्टोबरपासून आपली उड्डाणे बंद करणार आहोत. खरेतर गेल्या तीन वर्षांत पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या या हवाई सेवेला देश-विदेशातील प्रवासी आणि पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. असे असताना सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा अलायन्स एअरचा निर्णय दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर याचा विपरित परिणाम होणार आहे