
भूमिगत वीज वाहिन्यांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २६० कोटींचा निधी मंजूर.
वादळी वारे, चक्रीवादळ आणि अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीत वीजप्रवाहाची अखंडित सुविधा देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या दुसऱ्या टप्प्यासाठी २६० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.या प्रकल्पा अंतर्गत पहिल्या टप्प्यात ९० टक्के कामे आटोपली असून, दुसरा टप्पाही आता वेगात राबण्यात येणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वारे, मुसळधार पाऊस असो वा चक्रीवादळ याचा फटका महावितरणला बसतो. वीजपुरवठा खंडित तर होतोच शिवाय कोलमडलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वेळ, पैसा, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यामुळे केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प दोन अंतर्गत जिल्ह्यातील किनारपट्टी लगत २०० मीटर अंतरावरील गावातून भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.