
साठरेबांबर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली नजिकच्या साठरेबांबर गावामधील धनावडेवाडी येथे रविवारी पहाटेच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करताना अंधारामध्ये विहीर न दिसल्याने बिबट्या विहिरीत पडला. परंतू, सुदैवाने सायंकाळी वेळीच त्याचा ओरडण्याच्या आवाज आल्याने, शिवाय विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने, त्याला पिंजरा सोडून तत्काळ सुखरूप बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, साठरेबांबर गावामधील धनावडेवाडी योगेश जयराम धनावडे यांच्या घरालगतच्या विहिरीमध्ये पहाटेच्यादम्यान भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला होता. दरम्यान, सायंकाळी विहिरीतून बिबट्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने, त्यांनी पाहणी केली असता, विहिरीत बिबट्या पाण्यामध्ये पडल्याचे त्यांना आढळून आले. याची माहिती त्यांनी तात्काळ पाली परिमंडळ वन कार्यालयाचे वनपाल गौतम कांबळे यांना देताच, त्यांनी तत्काळ रात्रीच पाली येथील पिंजरा घेऊन, साठरेबांबर येथे जाऊन बिबट्याच्या सुटकेसाठी तो विहिरीत सोडला. विहीर जवळपास २५ फूट खोल होती. तर १० फुटापर्यंत पाणी होते. त्यावर बिबट्या तरंगत होता. तब्बल ३ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यामध्ये गेल्यावर त्याला वर आणून वैद्यकीय तपासणी वनविभाग पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी केली असता, तो नर जातीचा सहा वर्षांचा असून तो सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
बिबट्याची सुटका मोहीम विभागीय वन अधिकारी दीपक खाडे,सचिन नीलख, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ वन कार्यालय पालीचे वनपाल गौतम कांबळे, देवरूख वनपाल तौफिक मुल्ला, लांजा वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक नानु गावडे, विक्रम कुंभार, सागर पाताडे, राजेंद्र पाटील, मिताली कुबल यांनी स्थानिक ग्रामस्थ दिनेश चाळके, धनंजय चव्हाण, संतोष चव्हाण ,नयन साठले ,विजय बारगुडे , सचिन पेडणेकर, सरपंच वामन कांबळे यांच्या सहाय्याने पार पाडली. बिबट्याला पुन्हा सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
www.konkantoday.com