रत्नागिरी ग्राहक पेठच्या माध्यमातून महिलांना मिळाले हक्काचे व्यासपीठ….
.रत्नागिरी, ता. २४ : रत्नागिरी ग्राहक पेठच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. प्रत्येक प्रदर्शनावेळी रत्नागिरीतील नवनवीन उद्योगिनी व महिला बचत गट आपापली उत्पादने घेऊन येतात. यामुळे त्यांची आर्थिक उन्नतीही होत आहे, असे प्रतिपादन डॉ. शिवानी पानवलकर यांनी केले.रत्नागिरी ग्राहक पेठतर्फे टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये आयोजित महिला बचत गट प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर लायन्स क्लबच्या माजी झोन चेअरमन श्रेया केळकर, उद्योजिका साक्षी धुरी, श्री स्वामी समर्थ टूर्सच्या संचालिका प्रज्ञा देसाई व प्रिती रसाळ आणि ग्राहक पेठेच्या संस्थापिका प्राची शिंदे, प्रणिता देसाई उपस्थित होत्या. प्रास्ताविकामध्ये प्राची शिंदे महिला बचत गट, उद्योगिनींना मार्गदर्शन केले.याप्रसंगी स्वामी समर्थ टूर्सच्या संचालिका देसाई व रसाळ यांनी नावीन्यपूर्ण उद्योग सुरू केल्याबद्दल दोघींचा विशेष सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा सत्कार प्राची शिंदे यांनी कुंडीतील रोपटे देऊन केले. श्री स्वामी समर्थ टूर्सच्या संचालिका देसाई व रसाळ यांनी आपण टूर्स कशा आयोजित करतो, रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल सांगितले. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित सहलींचे त्या यशस्वीपणे नियोजन करत असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.सूत्रसंचालन अनघा निकम यांनी केले. संध्या नाईक यांनी गणेशवंदना सादर केली. राधा भट यांनी आभार मानले. या प्रदर्शनात दिवाळीसाठी आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, उटणे, चविष्ट फराळ, गिफ्ट, ब्रँडेड पर्सेस, परफ्युम्स, विविध घरगुती उत्पादने, कोकण मेवा, खाद्य पदार्थ, इन्स्टंट फूड प्रॉडक्टस्, साड्या, कपडे, अगरबत्ती, झाडे, खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.प्रदर्शन आजपासून २७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. प्रदर्शनादरम्यान महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. २५ ऑक्टोबरला दुपारी ४ वा. कौटुंबिक व व्यावसायिक जबाबदारीतून व्यक्तिमत्व जपणे एक कला यावर डॉ. शिवानी पानवलकर मार्गदर्शन करणार आहेत. २६ ऑक्टोबरला दुपारी ४.३० वा. आरोग्य विमाविषयक मार्गदर्शन सिनिअर सेल्स मॅनेजर (स्टार हेल्थ) समीर सुर्वे करतील. २७ ला दुपारी ३.३० वा. फनी गेम्स, ५ वा. भरतनाट्यम, जोगवा, दांडीया डान्स हे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.