
कोकणातील एकमेव विमानसेवा बंद होणार, मुंबई-चिपी विमान सेवा कराराची मुदत संपली.
मुंबईहून थेट तळकोकणात जाण्यासाठी सिंधुदुर्गातील ‘चिपी परुळे’ येथे प्रचंड खर्च करून विमानतळ उभारण्यात आले होते. या विमानसेवेला कोकणवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभला होता.मात्र, अनियमित सेवेमुळे ही विमानसेवा टीकेचे लक्ष्य ठरली होती. अशातच आता मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून (26 ऑक्टोबर) बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे.केंद्रीय हवाई वाहतूक उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचं मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन पार पडलं होतं. मुंबई ते चिपी आणि चिपी ते मुंबई ही सेवा तीन वर्षांसाठी एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत करार पद्धतीने सुरू केली होती. मात्र हा करार उद्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यामुळे या प्रवासाची 26 तारखेपासूनची तिकीट विक्री बंद होणार आहे. पर्यटन हंगामाला प्रारंभ झाला असून येत्या काही दिवसात दिवाळी आणि विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मात्र आता तिकीट विक्री बंद होणार असल्याने मुंबई ते चिपी प्रवास करणाऱ्या प्रवशांना फटका बसणार आहे.