‘घड्याळ’ कोणाचं? शरद पवार की अजित पवार? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; म्हणाले…!
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्यास मनाई करावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गेली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाने २ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (२४ ऑक्टोबर) फेटाळली आहे. न्यायमूर्ती म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू शकते. मात्र त्यांना या निवडणूक चिन्हाबरोबर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना द्यावी लागेल.*दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या पक्षाला यासंदर्भात नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १९ मार्च रोजीच्या आदेशानुसार सूचनेसह (Disclaimer – हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना) आम्ही निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू, असं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत या आदेशाचं पालन झालंच पाहिजे,असंही न्यायालयाने अजित पवारांच्या पक्षाला बजावलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या पक्षाला घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्या चिन्हाजवळ हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना नमूद करण्यास सांगितलं आहे.न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घ्यावा, असं शरद पवारांच्या पक्षाने म्हटलं होतं.