भरारी पथकांनी विशेषत: आयकर विभागाने अनधिकृत रोकडबाबत दक्ष रहावे -खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार
. रत्नागिरी, दि. 23 : जिल्ह्यातील सर्वच भरारी पथकांनी विशेषत: आयकर विभागाने सतर्क रहावे. अनधिकृत येणाऱ्या रोकडबाबत लक्ष ठेवून वाहनांची तपासणी करावी, अशी सूचना खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांनी केली.* येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात खर्च निरीक्षक श्री. कुमार यांनी सर्व विधानसभा मतदार संघातील खर्च संनियंत्रणाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड आदी उपस्थित होते. खर्च निरीक्षक श्री. कुमार म्हणाले, निवडणूक विषयक कामकाज हे आव्हानात्मक काम आहे. जिल्ह्यातील पथके चांगल्या पध्दतीने काम करत आहेत. लोकशाहीची सेवा म्हणून सर्वांनी आपली भूमिका ठेवून कामकाज करावे. अनधिकृत खर्च हा चिंतेचा विषय असतो. त्याबाबत पोलीस, एसएसटी, एफएसटी, राज्य उत्पादन शुल्क या सर्वांनाच 24 तास सतर्क रहावे लागते. नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींची माहिती ही सर्वांना देत जा. तपासणी नाक्यांवर अवैध मद्य, रोकड याबाबत हुशारीने तपासणी करा. लोकशाहीची सेवा म्हणून दिलेली जबाबदारी सर्वांनी चोख बजावावी. 25 धाडी घालून राज्य उत्पादन शुल्क विभागाने चांगली कामगिरी केली आहे. समाज माध्यमांवरही विशेष लक्ष ठेवावे, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी एकूणच जिल्ह्यात विविध पथकांनी केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यात गोवा बनावटीचे मद्य पकडलेल्या घटनांबाबत आणि सी-व्हीजीलवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे निराकारण, प्रत्येक विधानसभा निहाय ५ पथके तैनात ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार यांनीही यावेळी सविस्तर माहिती दिली. खर्च विषयक पथक प्रमुख उत्तम सुर्वे यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर कामकाजाची माहिती दिली.