जास्त ताणलं तर तुटूही शकते. भास्कर जाधव.
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यात राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीत आहेत तर इथं ठाकरे गट आणि शरद पवारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. विदर्भातील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात प्रचंड रस्सीखेच सुरू आहे.त्यात ठाकरे गटाचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख भास्कर जाधव यांनी काँग्रेसला जुन्या गोष्टींची आठवण करून देत जास्त ताणलं तर तुटूही शकते असा सल्ला दिला आहे. भास्कर जाधव म्हणाले की, काही लोकांची प्रवृत्ती, कार्यपद्धती असते, माझं ते माझं आणि तुझं तेही माझं… माझ्याकडे पूर्व विधानसभा क्षेत्र आहे, त्यात २८ विधानसभेच्या जागा आहेत. त्यात २०१९ च्या निकालात १४ काँग्रेस राष्ट्रवादीकडे आणि १४ भाजपा शिवसेनेने जिंकल्या आहेत. त्यामुळे १४ जागांवर आमचा हक्क आहे. परंतु त्यातील ८ ते १० जागा आम्ही मागितल्या आहेत. मित्रपक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे जागावाटपाचं घोडं अडलं आहे. महाविकास आघाडी तुटावी अशी शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची अजिबात इच्छा नाही. सर्वांनी मिळून तुटेपर्यंत ताणू नका असं त्यांनी सांगितले आहे. परंतु एका बाजूने आपण उभेराहिलो आणि दुसऱ्या बाजूने सातत्याने ताणत असेल, मी जागेवर राहिलो, ताणलं नाही आणि कुणीतरी दुसऱ्या बाजूने ताणत असेल तर तुटूही शकते. विदर्भात एकूण ६२ जागा आहेत त्यातील १२-१४ जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. १२-१४ जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी कशाला म्हणायची..? १२ ते १४ जागा आम्हाला मिळाव्यात त्यातील पूर्व विदर्भात ८ जागा मिळाव्यात असा माझा आग्रह आहे असं त्यांनी सांगितले.