लोकोपायलट सुनील कीर यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान.
मत्स्यगंधा एक्स्प्रेसचे इमर्जन्सी ब्रेक ऑपरेट करून संभाव्य अपघात टाळल्याबद्दल कोकण रेल्वेमध्ये कार्यरत असलेले कोंडगाव-साखरपामधील लोकोपायलट सुनील कीर यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गोवा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा गौरव झाला.कोकण लोकोपायलट सुनील कीर हे लोकोपायलट असून, २९ सप्टेंबर २०२३ ला कोकण रेल्वेमार्गवरील मत्स्यगंधा एक्स्प्रेसवर सेवा बजावत होते. रत्नागिरी ते मडगाव या प्रवासादरम्यान रूळावर नारळाचे झाड कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोकोमोटिव्ह पायलट सुनील कीर आणि त्यांचा सहकारी निमिष कदम यांनी प्रसंगावधान राखत अत्यावश्यक (इमर्जन्सी) ब्रेक कार्यरत केले.त्यामुळे रेल्वे थांबली आणि संभाव्य अपघातापासून अनेकांचे प्राण वाचले. त्यांनी केलेल्या या कामगिरीबद्दल कोकण रेल्वेचे चेअरमन संतोषकुमार झा यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. कीर हे मूळचे साखरपा गावातील असून, १९९२ मध्ये ते कोकण रेल्वेत चालक म्हणून रूजू झाले. त्यानंतर २००६ ला असिस्टंट लोकोपायलट आणि त्यानंतर २०१६ मध्ये लोकोपायलट म्हणून पदोन्नती मिळाली. पुढे त्यांना ए ग्रेड बढती देण्यात आली. कीर यांनी यापूर्वीही असे पुरस्कार मिळवले आहेत.