भविष्य निर्वाह निधी विभागाची शिवाजी विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस, भ्रष्टाचाराच्या आरोपाने खळबळ!

कोल्हापूर : भविष्य निर्वाह निधी विभागाने शिवाजी विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस लागू केली आहे. यामुळे विद्यापीठाला मोठा आर्थिक भूर्दंड भरावा लागणार असल्याचे गर्जना श्रमिक संघाचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे, कार्यालय सचिव विनायक चिटणीस यांनी पत्रकात म्हटले आहे. तर, याचा विद्यापीठाने इन्कार केला आहे. शिवाजी विद्यापीठात सुमारे १६० हून अधिक सुरक्षारक्षक, अन्य कंत्राटी कामगार कार्यरत असून, विद्यापीठाने संबंधिताचा विमा आणि भविष्य निर्वाह निधीकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणी गर्जना श्रमिक संघाने विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडे तक्रार केली असता विद्यापीठाला या भ्रष्टाचारप्रकरणी दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावून खडसावले आहे. त्यावर विद्यापीठाने कोणतेही उत्तर दिलेले नाही. व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केवळ पाच मिनिटे चर्चा करून प्रकरण गुंडाळले आहे.*२५० कोटींचा भुर्दंड ?*याप्रकरणी केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सखोल चौकशी करून दंड आकारायचा झाल्यास विद्यापीठाला किमान २०० ते २५० कोटींचा भुर्दंड लागण्याची शक्यता व्यक्त करून बेलवाडे यांनी या दंडाची जबाबदारी कुलगुरू घेणार की अन्य अदृश्य हात घेणार की नाही याची स्पष्टता करण्याची मागणी केली आहे. शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षक, माळी, शिपाई तसेच अनेक कामासाठी कंत्राटावर कामगार घेतले आहेत. एका निविदेच्या प्रकरणात कर्मचारी विमा आणि भविष्य निर्वाहचे चलन भरल्याचा घोटाळा प्रकरणी आधीच संबंधित विभागाची कारवाई सुरू असताना आता विद्यापीठ प्रशासनाने अजून एक घोटाळा केला आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या पवित्र आणि ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या संस्थेने असे घोटाळे करणे हे लज्जास्पद आहे, असा आरोप बेलवाडे, चिटणीस यांनी केला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडून शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षक, कंत्राटी कर्मचारी यांना ईपीएफ सुविधा प्राप्त होण्यासाठी नोंदणी करण्याबाबत कळवले असून, सहकार्य करण्याची तयारी आहे. या प्रश्नी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा होऊन समिती नियुक्त केली आहे. सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी खाते उघडण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असून, कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, असे निवेदन कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button