महाविकास आघाडीचे सरकार आले, तर दीड हजार रुपये ऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असं महिलांना सांगावे लागेल-श्याम मानव.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लाडकी बहीण योजनेबद्दल काही टिप्स दिल्या आहेत. नागपुरात संविधान बचाओ, महाराष्ट्र बचाओ सभेत बोलताना श्याम मानव म्हणाले की लाडकी बहीण योजना हलक्याने घेण्याची गरज नाही.उलट तुम्ही लाडक्या बहिणींचं कौतुक करा, असं ते म्हणाले. मविआचं सरकार आल्यानंतर दीड हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये देऊ असं सांगावं लागेल, असा सल्ला श्याम मानव यांनी दिला.महिलांच्या नावावर त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकार मला दीड हजार रुपये पाठवत आहे ही त्यांच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. या दीड हजार रुपयांमध्ये स्त्रियांची क्रयशक्ती वाढेल. त्या कुटुंबावर पैसे खर्च करतील, त्यामुळे छोटे उद्योग व्यवसायांना चालना मिळेल. आपण या योजनेचे समर्थनच केले पाहिजे, असं श्याम मानव म्हणाले.महिलांना समजावून सांगितले पाहिजे की ही योजना चांगली आहे, तुम्ही ही आमच्या लाडक्या बहिणी आहात, पण पहिले तुम्ही या उद्दाम भावांना (महायुतीला) हाकला हे राज्यातील त्यांना समजावून सांगावे लागेल. तसेच पुढे महाविकास आघाडीचे सरकार आले, तर दीड हजार रुपये ऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असं महिलांना सांगावे लागेल. हे तुम्ही महिलांना बेधडक सांगावं, असा सल्ला देखील श्याम मानव यांनी दिला.