मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा; १ सप्टेंबरचाही मुहुर्त चुकला! हवामान बदलामुळे सेवेस विलंब!!


मुंबई ते रत्नागिरी प्रवास तीन तासात तर मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास पाच तासात करण्यासाठी मुंबई ते विजयदुर्ग, सिंधुदुर्ग अशी रो रो सेवा सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. त्यानुसार गणेशोत्सवाआधी ही सेवा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार होती. मात्र हा मुहुर्त चुकला असून त्यानंतर सागरी मंडळाने १ सप्टेंबरला सेवा सुरु करण्याचे नियोजन केले होते. मात्र आता हा, १ सप्टेंबरचाही मुहुर्त चुकला आहे. हवामान बदलामुळे रो रो बोटीची चाचणी घेणे शक्य होत नसल्याने चाचणी लांबली आहे.

मुंबई -गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांनी रखडल्याने रस्ते मार्गे मुंबई ते कोकण प्रवास करणाऱ्यांना बरीच कसरत करावी लागते. दुसरीकडे रेल्वे, एसटी प्रवासही १० ते १४ तासांचा असतो. त्यात गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद आणि सुकर करण्यासाठी मुंबई ते विजयदुर्ग अशी रो रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विजयुदुर्ग येथील प्रवासी जेट्टीचे रुपांतर रो रो जेट्टीत करण्यासह इतर कामे हाती घेण्यात आली. ही कामे २० आॅगस्टपर्यंत संपवत त्यानंतर रो रो बोटीची चाचणी घेत २५ आॅगस्टपर्यंत रो रो सेवा सुरु करण्याचे नियोजन सागरी मंडळाचे होते. मात्र काही परवानग्या न मिळाल्याने हा मुहुर्त सागरी मंडळाला साधता आला नाही. पण त्यानंतर मात्र सागरी मंडळाने आवश्यक त्यात १४० हून् अधिक परवानग्या मिळवल्या. तर दुसरीकडे एम टू एम प्रिन्सेस २ ही बोटही सज्ज करण्यात आली आणि १ सप्टेंबरला रो रो सेवा सुरु करण्याचे मत्स्य व्यवसायआणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.

गणेशोत्सावासाठी रो रोने तीन ते पाच तासात कोकणात जाता आले नाही तर गणेशोत्सवानंतर मुंबईत रो रोने पोहचता येईल असे प्रवाशांना वाटत असतानाच आता १ सप्टेंबरचाही मुहुर्त चुकला आहे. १ सप्टेंबरला रो रो सेवा सुरु होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.याविषयी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी यांना विचारले असता त्यांनी हवामान बदलामुळे रो रो बोटीच्या चाचण्या घेणे अशक्य होत आहे. चाचण्यांसाठी हवामान योग्य झाल्यास चाचण्या घेत रो रो सेवा वाहतुकीसाठी खुली करु. शक्य तितक्या लवकर ही सेवा सुरु करु. सेवा कधी सुरु होणार याची माहिती लवकरच जाहिर करु असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button