शिक्षणाबरोबरच शेतीची आवड निर्माण करणारी वाटदची आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

शिक्षणाने होणाऱ्या बौध्दिक विकासाबरोबरच शेतीची आवड निर्माण करुन मातीशी आणि पर्यावरणाशी प्रेम निर्माण करणारे उपक्रम वाटद कवठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राबविण्यात येत आहेत. शेतात कसून पिकवलेल्या धान्य आणि भाजीपाल्यातून शाळेतील‍ विद्यार्थ्यांना दर बुधवारी आहार देणारी राज्यातील ही एकमेव आदर्श शाळा असावी.

भारत कृषी प्रधान देश आहे. कृषी संस्कृतीतून विविधतेतून एकता याचे दर्शन जगाला घडवत आहे. देशाच्या प्रगतीचा आर्थिक कणा हा कृषी क्षेत्रामधून ताठ झालेला आहे. प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी तृणधान्य वर्ष साजरे करण्यासाठी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे यांनी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने नाचणी, तांदूळ लागवडीचा उपक्रमच हाती घेतला. शाळेच्या आजूबाजूची पडीक जमीन शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कसण्यासाठी विना मोबदला घेतली. ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी यांच्या मदतीने नाचणी, भात सारखे उत्पादन त्यांना चांगले मिळाले. शाळेच्या परसबागेत वांगी, मुळा, मसाल्याची झाडे, नारळ, पपई, केळी अशी वृक्षसंपदाही लावली. त्याशिवाय सुनिता बाळकृष्ण कुरटे या ग्रामस्थांच्या जागेत देखील विद्यार्थ्यांच्या सहाय्याने भाजीपाला पिकवला. आलेले उत्पादन विद्यार्थ्यांच्याच आहारात समावेश करण्यासाठी शालेय पोषण आहाराबरोबरच दर बुधवारी शाळेमध्ये नाचणीची भाकरी, भाजी, भात, आमटी असा आहार दिला जातो. शाळेत एकण १५ मुले व १६ मुली शिक्षण घेत आहेत. एकूण २६ पालकांनी पुढाकार घेत जेवण बनविण्यासाठी दिवस ठरवून घेतले आहेत.

शाळेला भेट देणाऱ्या विविध प्रशासकीय अधिकारी, पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाते. त्या झाडाला त्या पाहुण्याचे नाव दिले जाते, तशी पाटीही प्रत्येक झाडाला लावलेली दिसते. यामधून वृक्षाचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा उद्देश आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीही येथे वृक्षारोपण केले आहे. शाळेचा हा उपक्रम पाहून ग्रामस्थांनीही आजूबाजुची जमीन कसायला सुरुवात झाली आहे. असे सांगून श्री. अंकलगे म्हणाले, शाळेला आदर्श शाळा पुरस्कार परसबागेविषयी तसेच माझी शाळा सुंदर शाळा यामध्येही गौरविले आहे. चिकू, लिंबू, नारळ, केळी, आंबा, आवळा, मसाल्याची झाडे अशी झाडे संवर्धित केली आहेत. आंबा, आवळा लोणचे देखील बनविले जाते. अशा विविधांगी उपक्रमातून शाळेचे कौतुक होत आहे. सूर्यनमस्कार, दोरी उड्या, योगासने याचाही तास होतो. यामध्ये देखील सर्वसाधारण विजेतेपद शाळेने पटकावले आहे.

– पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यातून शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. यामधून शेतीची आवड निर्माण करणे, बौध्दिक विकासाबरोबर शारीरिक विकास घडविणे हा उद्देश आहे.

शिक्षण घेऊन जगाच्या पाठीवर करिअर घडविण्यासाठी भविष्यात उत्तुंग भरारी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गावच्या मातीशी ओढ निर्माण करणारी, शेतीची आवड निर्माण करणारी , पर्यावरणावर प्रेम करायला शिकवणारी वाटदची जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा राज्यात एकमेव असावी. *- प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते**जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button