राज्य शासनामार्फत “कुष्ठरोग” हा अधिसूचित आजार घोषित

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ३० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, “कुष्ठरोग” हा आजार राज्यातील अधिसूचित आजार (Notifiable Disease) म्हणून घोषित करण्यात आला आहे.

कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार असून देशातील एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. या आजाराचे लवकर निदान व वेळेवर उपचार न झाल्यास शरीरावर विकृती, दिव्यांगता आणि सामाजिक कलंक निर्माण होण्याची शक्यता असते. कुष्ठरोग हा केवळ आरोग्याचा नव्हे तर सामाजिक भेदभावाशीही संबंधित आजार मानला जातो. हा बहुविध औषधोपचाराने (MDT) पूर्णपणे बरा होणारा आजार असून, लवकर निदान आणि नियमित उपचाराद्वारे या आजाराचे नियंत्रण शक्य आहे. राज्य शासनाने “कुष्ठरोग निर्मूलन” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे. पुढील तीन वर्षांमध्ये राज्य “कुष्ठरोगमुक्त दर्जा” प्राप्त करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

राज्य शासनाने कुष्ठरोग प्रतिबंध, निदान आणि उपचार व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी काही मुद्दे निश्चित केले आहेत. यामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (NLEP) अंतर्गत सर्व रुग्णांना आवश्यक उपचार सेवा उपलब्ध करून देणे, उपचारानंतर पुनरागमन (Relapse) किंवा विकृती निर्माण झालेल्या रुग्णांची नोंद घेऊन त्यांना पुनर्वसनासाठी आवश्यक सहाय्य देणे, कुष्ठरोग संक्रमणाच्या प्रतिबंधासाठी निकट संपर्कातील व्यक्तींना केमोपोफिलॅक्सिस (Chemoprophylaxis) देण्याची सोय करणे, औषध प्रतिरोधक कुष्ठरोग (Drug Resistant Leprosy) रुग्णांच्या निदान व व्यवस्थापनासाठी सहाय्य उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद करणे आणि ती संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना (जिल्हा आरोग्य अधिकारी / वैद्यकीय अधिकारी) अहवाल स्वरूपात सादर करणे बंधनकारक असणार आहे.

उपचार, पुनरागमन प्रकरणे आणि कुष्ठरोगाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींवरील पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PEP) उपचाराची माहिती देखील अहवालात देणे आवश्यक आहे. राज्य शासनाचा हा निर्णय “राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम” अधिक प्रभावी करण्यास हातभार लावेल. या अधिसूचनेमुळे निदान, उपचार आणि रुग्णसेवा यांचा दर्जा उंचावेल तसेच “कुष्ठरोगमुक्त महाराष्ट्र” या ध्येयाच्या पूर्ततेस गती मिळणार आहे.

“सर्व शासकीय, खासगी वैद्यकीय संस्था व डॉक्टरांनी या अधिसूचनेचे पालन करून जिल्ह्यातील कुष्ठरोग प्रतिबंध व नियंत्रण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. विवेकानंद बिराजदार यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button