टोलमुक्तीनंतर आनंदनगर टोलनाक्याची रचना बदलणार!

ठाणे : मुंबईच्या प्रवशद्वारावरील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी संपूर्ण टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर हलक्या वाहने कोंडीत अडकू नये यासाठी आता आनंदनगर टोलनाक्यावर नव्याने रचना करण्याचे नियोजन टोल कंपनीकडून सुरू आहे. त्यानुसार, टोलमुक्त मोटारी आणि इतर वाहनांसाठी वेगळ्या मार्गिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे.*ठाणे, नवी मुंबई शहरातून लाखो नोकरदार त्यांच्या वाहनांनी मुंबई गाठत असतात. या वाहन चालकांना टोल आकारला जातो. त्यामुळे दररोज वाहन चालकांना टोलचा फटका सहन करावा लागत होता. मुलुंड आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर टोलनाक्यावरून अधिक वाहनांची वाहतुक होत असते. टोलनाक्यावरील काही मार्गिका या फास्टॅग असलेल्या मोटारी आणि काही मार्गिका दैनंदिन टोल वसूलीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. टोल वसूली दरम्यान वाहतुकीचा खोळंबा झाल्यास कोंडीची समस्या चालकांना सहन करावी लागते. टोल वसूलीविरोधात विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली होती. अखेर राज्य शासनाने आता हलक्या वाहनांसाठी मुंबईच्या पाचही टोलनाक्यावर वाहनांना टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दररोज मोटारीने मुंबई गाठणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. हलक्या वाहनांना टोलमाफीचा निर्णय लागू झाल्याने आनंदनगर येथील टोलनाक्याची रचना बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यानुसार, आराखडा तयार केला जात असून येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेले दोन टोलनाके हटविले जाण्याची शक्यता आहे. तसेच मालवाहू वाहनांना किंवा टोलमाफीपासून वगळण्यात आलेल्या वाहनांना इतर मार्गिकेतून प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. टोल माफी करण्यात आलेल्या वाहनांना आता इतर मार्गिका उपलब्ध झाल्यास आनंदनगर टोलनाक्यावर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.टोलनाक्यावर हलक्या वाहनांना टोलमाफी दिल्यानंतर लहान आकाराचे ट्रक, टेम्पो चालक देखील टोल नाक्यावर टोल देण्यास टाळाटाळ करत होते. हलक्या वाहनांनामध्ये आमची वाहने मोडतात असा दावा त्यांच्याकडून केला जात होता. तर टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून टोल मागितला जात होता. त्यामुळे चालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडत असल्याचे चित्र विविध टोलनाक्यांवर पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button