राज्यपाल नियुक्त ७ आमदारांचा आजच शपथविधी? शासनाकडून राजपत्र जारी; चित्रा वाघ, पंकज भुजबळ, हेमंत पाटलांचा समावेश!
राज्यात विधानसभेच्या निवडणुका ऐन तोंडावर आहेत. कुठल्याही क्षणी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होऊ शकते. या घालमेलीत राज्य सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.*मंगळवारी दुपारी १२ वाजता ७ आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. विधीमंडळामध्ये उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार असून महायुतीकडून 7 जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाकडून अधिकृत राजपत्र जारी करण्यात आलं आहे.मंगळवारी शपथ घेणाऱ्या सात नावांमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा समावेश आहे. त्यांच्यासह विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील, मनिषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे. राज्यपाल नियुक्त आमदार निवडले तर ठाकरे गट पुन्हा न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. 12 पैकी महायुतीतील 7 जणांची नाव निश्चित केल्यानंतर ठाकरे गटाकडून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.7 ऑक्टोबरला सदर याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे, मात्र अजूनही निकाल बाकी आहे. या याचिकेचा निर्णय राखीव असताना आणि वादग्रस्त विषयाचा निर्णय प्रलंबित असताना त्या विषयावर निर्णय घेणे उचित होणार नाही असं ठाकरे गटाच म्हणणं आहे.अशा परिस्थितीत राज्यपालांनी जर ह्या नावांवर मान्यता दिली तर त्यांच्याविरुद्ध ठाकरे गट उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मिळतेय.