महायुती सरकारच्या कारभाराचा पंचनामा; महाविकास आघाडीकडून पुस्तिकेच प्रकाशन! ५० हजार कोटींचे घोटाळे झाल्याचा आरोप!!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील भ्रष्टाचारापासून लेकीबाळी सुरक्षित नाहीत, प्रत्येक कामात कमिशन, शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशी विविध उदाहरणे देत महाविकास आघाडीने महायुती सरकारच्या कारभाराचे ‘गद्दारांचा पंचनामा’ या माध्यमातून वाभाडे काढले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ‘गद्दारांचा पंचनामा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. ‘महाराष्ट्र धर्म बुडवला, गुजरात चरणी अर्पण केला, हे महायुतीचे पाप’ या शब्दांत महायुतीवर कोरडे ओढण्यात आले आहेत. महायुती सरकारच्या काळात सुमारे ५० हजार कोटींचे घोटाळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.**विविध घोटाळ्यांचे आरोप

मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण निविदा १६ हजार कोटी, जलयुक्त शिवार १० हजार कोटी, रुग्णवाहिका आठ हजार कोटी, मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरण सहा हजार कोटी, आरोग्य विभाग ३२०० कोटींचा घोटाळा.

धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे एक लाख कोटींचा घोटाळा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी १ कोटी, जिल्हा शल्यचिकित्सक २५ लाख, उत्पादन शुल्क विभागात पदभरती प्रत्येकी १५ लाख, तलाठी प्रश्नपत्रिका १५ लाख, कनिष्ठ अभियंता १० लाख , ड विभागातील सरकारी नोकरी ७ लाख रुपये असे महायुती सरकारच्या काळात दर असल्याचे दरपत्रकच देण्यात आले आहे.

महिला अत्याचारांमध्ये वाढ, गुन्हयांमध्ये ३५ टक्के वाढ, प्रतिदिन सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था धोक्यात, अनेक आश्वासने अपूर्ण याकडे पंचनाम्यात लक्ष वेधण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button