
रत्नागिरी नगर परिषद स्वखर्चातून करणार रस्त्यांची दुरूस्ती
गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरूस्ती नगर परिषद स्वत:हून करून घेणार आहे. हा खर्च रस्ता डांबरीकरण करणार्या ठेकेदाराच्या बिलातून वसूल केला जाणार आहे. शहराच्या जयस्तंभपासून एसटी स्टॅण्डकडे जाणार्या खालच्या भागातील परिघात डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे.
डांबरीकरणाचे काम करणारा ठेकेदार जाहीद खान याला दुरूस्ती करून देण्याची नोटीस देण्यात आली. परंतु ठेकेदाराने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे रनप स्व खर्चातून रस्त्याची दुरूस्ती करणार असल्याचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण सुमारे तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले. अनेक ठेकेदारांकडून ही कामे करण्यात आली असून शहराच्या खालच्या भागातील रस्त्यांची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डेच खड्डे पडले असल्याने तक्रारी येऊ लागल्या. डांबरीकरणानंतर पुढील दोन वर्षे ठेकेदाराने त्या रस्त्यांची देखभाल दुरूस्ती करायची असते. त्यानुसार ठेकेदार जाहीद खान यांना दुरूस्तीबाबत नोटीस देण्यात आली. महिनाभरापूर्वी ही नोटीस देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने आणि आता गणेशोत्सवही तोंडावर असल्याने रस्त्यांची दुरूस्ती रत्नागिरी नगर परिषद स्वत:च्या यंत्रणेकडून करून घेणार असल्याचे मुख्याधिकार्यांनी सांगितले.