“मला दिल्लीकरांची पर्वा नाही, त्यांना गाडून भगवा फडकवणार”, उद्धव ठाकरेंचा इशारा!!
मुंबईत आज शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले आहेत. यापैकी शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पार पडला. या दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुतीसह भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. “मला दिल्लीकरांची पर्वा नाही. किती पिढ्या यायच्या तितक्या येऊ द्या, मी त्यांना गाडून भगवा फडकवून दाखवणार”, अशा इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपाला नाव न घेता दिला आहे.“प्रत्येकाकडे वेगवेगळे शस्त्र असतात. कोणाकडे गन, कोणाकडे मशीन गन आहे. कोणाकडे तलवार आहे. मात्र, आमच्याकडे लढवय्या मन आहे. ही लढाई साधी सोपी नाही. एकीकडे बलाढ्य अब्दालीसारखी माणसं आहेत. केंद्राची सत्ता आहे, शासकीय यंत्रणा आहे. ते आधीच्या काळात स्वाऱ्या यायच्या आणि गावच्या गावं नेस्तनाबूत केली जायची. आताही त्यांचा मनसुबा आहे की मला नेस्तनाबूत करायचं. मात्र, त्यांना ही कल्पना नाही, ही फक्त शिवसेना नाही तर वाघनख आहेत. ते मला बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले आहेत. आज माझ्याबरोबर जनता आहे. जनतेचं पाठबळ मला नसतं तर मी उभा राहू शकलो नसतो. मला दिल्लीकरांची परवा नाही. त्यांच्या कितीही पिढ्या आल्या तरी मी त्यांना गाडून त्यांच्या भगवा फडकवल्या शिवाय राहणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.“दरवर्षी आपल्या शिवसेनेला अंकुर फुटत आहेत. येथील प्रत्येक शिवसैनिक बाळासाहेबांची मशाल बनून या भ्रष्टाचाऱ्यांची चूड लावल्याशिवाय राहणार नाहीत. आताचच्या काळात उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं दुर्मीळ झालं आहे. मात्र, रतन टाटा यांच्यासारखे उद्योगपती थोडे असतात. टाटांनी अनेक गोष्टी दिल्या आहेत. आपल्या जेवणातील चव वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं. पण आजचे काही उद्योगपती मिठागरे गिळत आहेत. टाटा गेल्याचं दुख वाटतं आणि मिठागरे गिळणारे जात का नाहीत याचं वाईट वाटतं. जे जायला पाहिजे ते जात नाहीत आणि जे जाऊ नयेत ते जात आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.“भाजपाला लाथ घातली याचं कारण त्यांचं हिंदुत्व हे गौमूत्रधारी आणि बुरसटलेले हिंदुत्व आहे. आज या लोकशाहीच्या युद्धाला सुरुवात करताना मी तुम्हाला प्रश्न विचारतो. मी घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही? मी त्यांच्याशी लढतो हे बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? मग जा त्या शिंदेंना सांगा. तुझा विचार हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाही. आज त्यांनी जी काही जाहीरात केलेली आहे. की हिंदुत्व आमचा श्वास आणि मराठी आमचा प्राण. मग पुढच्या दोन ओळी राहिल्या आहेत. हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदाणी आमची जान आणि आम्ही शेठजींचे श्वान या ओळी राहिल्या”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.