गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत ग्राहक पंचायतीने निवेदन.
रत्नागिरी : गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत तसेच बसमधील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाबाबतचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे एसटीचे रत्नागिरी विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांना देण्यात आले.एसटीच्या एक प्रवासी सौ. प्रज्ञा सावंत यांनी एसटी बसमधील असुविधा, कर्मचाऱ्याचे उद्धट वर्तन आणि बसमधील गैरसोयीबाबत तक्रारवजा पत्र ग्राहक पंचायत (महाराष्ट्र) या संस्थेच्या रत्नागिरी शाखेकडे पाठवले होते. त्यांनी गेल्या ६ ऑक्टोबर २०२४ रोजी नालासोपारा-रत्नागिरी एसटी बसमधून चिपळूण ते रत्नागिरी या प्रवासात मिळालेल्या विपरीत अनुभवाविषयी त्यात लिहिले आहे. या तक्रारी गंभीर आहेत आणि एसटी महामंडळाने तातडीने दखल घेण्यासारख्या आहेत, असे नमूद करून ग्राहक पंचायतीतर्फे विभाग प्रमुखांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, नालासोपारा-रत्नागिरी ही एसटी बस संपूर्णपणे गळत होती. तेव्हाच पाऊस सुरू असल्याने प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागला. बसला हेडलाइट नव्हते. अपुऱ्या प्रकाशामुळे एसटी बस वाटेत थांबवावी लागली. चालकाने तात्पुरती दुरुस्ती करून हेडलाइट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बस पुढे मार्गस्थ झाली. सौ. सावंत यांना रत्नागिरीजवळच्या महालक्ष्मी येथे उतरायचे होते. तसे त्यांनी कंडक्टरला सांगितले. पण कंडक्टरने त्यासाठी त्यांच्या तिकिटाची मागणी केली. तिकीट परत द्यायचे नसेल, तर महालक्ष्मी येथे एसटीचा थांबा नसल्यामुळे कुवारबाव येथे उतरावे लागेल, असे त्यांनी सांगितले. खरेदी केलेले तिकीट ही प्रवाशाचीच मालमत्ता असते. कोणत्याही स्थितीत ते कंडक्टरला परत करणे चुकीचे होते. तशी मागणी कंडक्टरने करणेही चुकीचे होते. या साऱ्या प्रकाराबाबतची तक्रार देण्यासाठी सौ सावंत यांनी कंडक्टरकडे तक्रार पुस्तक मागितले, मात्र तशी कोणतीही व्यवस्था नसल्याचे त्याने सांगितले. एसटी बसमधील गैरसोयी, गळती, हेडलाइट नसणे या साऱ्याला आपण जबाबदार नसल्याचेही कंडक्टरने सांगितले.ग्राहक पंचायतीकडे ही तक्रार आली असल्यामुळे याबाबतची चौकशी करून प्रवासी म्हणून सौ. सावंत यांना व्यक्तिशः तसेच ग्राहक पंचायतीला चौकशीचा अहवाल शक्य तितक्या तातडीने द्यावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. सौ. सावंत यांनी ग्राहक पंचायतीकडे दिलेल्या पत्राची पत्राची झेरॉक्स प्रत तसेच एसटीची छायाचित्रेही सोबत जोडण्यात आली. निवेदन देताना ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संदेश सावंत, सचिव आशीष भालेकर, सहसंघटक उमेश आंबर्डेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.ही बस पालघर विभागातील नालासोपारा आगाराची असल्याने ग्राहक पंचायतीची तक्रार त्या विभागाकडे तातडीने पाठविली जाईल, असे आश्वासन श्री. बोरसे यांनी दिले.